अनिर्बंध

सबला

‘स्त्री आणी तिची मुक्ती’ अशा विषयावर सध्या चाललेल्या चर्चा वाचून मला राहून राहून एकाच स्त्रीची आठवण होत रहातेय.
माझी आजी.
मी तिच्याकडून कळतनकळत खूप शिकले. हे व्यक्तीचित्र मी आदर्श म्हणून अजिबात लिहीत नाहीये.
कारण कुणीच कुणासाठी ‘आदर्श’ असू शकते असे मला वाटत नाही. पण तरी तिच्याकडे बघताबघ्ता मला माझ्या आतल्याच खूप गोष्टी ‘सापडल्या’.
तिचा ‘स्त्रीमुक्ती’ या शब्दाला कायम विरोध होता, कारण मुक्ती म्हणजे ‘डायरेक्ट मोक्ष’ हाच इतकाच अर्थ तिला पटायाचा. मुक्त होऊन ‘स्त्री’ नक्की करणार तरी काय, असा प्रश्न तिला कायम पडायचा.
पुरुष आणि स्त्री या दोघामधाला नैसर्गिक फरक संपणार नाही, तो संपवायची गरजही नाही, कारण तो फरकच त्याना पूरक असतो, याबद्दल तिची मते ठाम होती.
त्यामुळे तिने ना कधी पुरुषांना शत्रू मानले , ना स्त्रियांना. .
एकंदरीत पुरुषांची थट्टा मात्र पुष्कळ करायची ती. ‘मुलांबद्दल बोलताना, तुझी मुले बघ कशी वागतायत , आणि लंगोट हरवला की ‘आपला तो लंगोट कुठे गेला ग?’ असे असतात पुरुष!
तश्या त्या पिढीतल्या बर्‍याच बायका तिच्यासारख्याच होत्या. म्हटले तर सरळ सध्या, म्हटले तर हिकमती! ना वैतागता, ना घाबरता पण न भांडता, समरसून जगणार्‍या.

तिच्या ‘टिन एज’ मध्ये तिनी भूमिगत स्वातंत्र्यसैनिकाना भाकर्‍या पोचवणे, त्याच्या पिस्तुली गोठ्यात लपवून रोज स्वच्छ करणे वगरै कामे केली होती. ती मेट्रिक झाली, हिंगण्याला होस्टेलवर राहून देखील शिकली. तिला मराठी इंग्लिश, हिंदी, तेलुगु आणि कानडी या भाषा वाचता, लिहिता, बोलता यायच्या. तिला उत्तम पोहता यायचे. गाण्याची, नृत्याची, नाटकाची उत्तम जाण होती. सुग्रणपणाला तर तिच्या पिढीत ऑप्शनच नव्हता!
तशी ती मुक्त कधीच नव्हती, पण ती ‘बद्ध’ पण नव्हती.
तिनी कधीही पैसे कमावले नाहीत, पण त्यामुळे ती कधीही दीनवाणी झाली नाही.
उलट तिचा हात कायम ‘देणारा’ होता. कसे काय कुणास ठाऊक?
ती आजोबांशी कधीही भांडली नाही, तिनी त्यांचे मन कधीही मोडले नाही;
पण त्यासाठी तिनी स्वत:चे मनदेखील मोडले नाही.
घरादारावर कायम तिच्याच नजरेचा वचक असायचा!
तिनी जे असेल त्यात संसार केला, पण तिचा चेहरा कधी कुणी उदास, रडका पहिला नाही.
पैशाची कायमच चणचण असायची, पण आनंदाची नसायची. तिनी कधीही आजोबांकडे त्यांनी अजून पैसे कमवावेत म्हणून हट्ट केला नाही. तिच्या वागण्यात मात्र कधीच गरिबी नसायची. आजोबाना अपमानास्पद वागणूक दिलेल्या, तिच्या २ जवळच्या नातेवाईकान्च्या घरात तिनी आयुष्यभर पाउल टाकले नाही. तिनी त्याबद्दल कडवटपण आणि द्वेषही बाळगला नाही. पण स्वत:चा पैसा आणि स्वत:च्या मालकीचे घर वगरै काहीही नसून, तिची मान कायम ताठ राहिली.
तिच्या आयुष्याची आणि तिच्या संसाराची ती कायम ‘बॉस’ होती.
आजोबा त्यावेळेसची ‘अ‍ॅडव्होकेट’ ची परिक्षा देऊन वकिली करत होते. आलेल्या अशीलाना कोर्टात नेण्याऐवजी बर्‍याचवेळेस ते काहीतरी मधला उपाय काढून , दोन्ही बाजूना बोलावून घेऊन, समजावून, तंटा सोडवून आनंदानी घरी परत पाठवून द्यायचे, ते देखील एकाही पैसा ना घेता. याबद्दल आजीची काहीही तक्रार नसायची.
घरात ७ मुले, सासर, माहेरचे विश्रांतीसाठी आलेले आजारी पाहुणे, इतर मित्रमंडळी, नातेवाईक सतत असायचे. घरातले, नातेवाईक, शेजारचे, मित्रमंडली, अगदी पाळलेली कुत्रे मांजरे यांच्यापैकी कुणालाही शुश्रुषेची गरज असेल, तर ती तिथे असायची. शिवाय चातुर्मासात, नादारीवर शिकणारे विद्यार्थी, एकटे रामादासीबुवा, पुजारी अश्या कुणालातरी जेवायला बोलवायची पद्धत तिनी अनेक वर्षे पाळली.
तिचे माहेर म्हणजे,कडक सोवळ्यातले वैष्णव, असल्यानी ती कधीच आंघोळीशिवाय स्वैपाकाला लागली नाही. पण ती सकाळी १०- १०.३० वाजता, अगदी सणावाराला सुद्धा, स्वैपाकघरातून मोकळी झालेली असायची!
तिचा स्वैपाक कधी बिघडला नाही, कधी कमी पडला नाही की कधी उरला नाही!
तिनी नोकरी केली नाही, पण कामे मात्र खूप केली. अगदी स्वत:च्या आवडीचीच केली. पुष्कळ कविता लिहिल्या, कथा लिहिल्या. साहित्य संमेलनातून काम केले. अनेक वर्षे दासबोध मंडळाच्या परिक्षांसाठी लोकाना घरोघर जाऊन माहिती देणे, शिकवणे, मदत करणे, पेपर तपासणे हे काम तिनी विनामोबदला केले. या सगळ्यात अनेक वेळेस अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ‘पुरुष’मंडळींबरोबरच कामे असायची. पण त्यातदेखील कधी तिला/ आजोबांना कुणाला काही चुकीचे वगरै वाटले नाही.
तिच्या ९२ वर्षांच्या आयुष्यात तिच्या तोंडून कधीही कुणीही ‘कंटाळा’ हा शब्द ऐकला नाही.
तिनी कधी वेळ वाया देखील घालवला नाही की कधी घाईगडबड, धावाधावही केली नाही. तिची सगळी कामे एका ‘रिदम’ मध्ये चालायची.
तीनी नोकारी करणार्‍या सुनेला सकाळी डबा करून दिलाय, नोकरी ना करणार्‍या सुनेला भरतकाम, विणकाम, आणि खास सुग्रणपणाचे जिलेबी, बालुशाही वगरै पदार्थ शिकवलेत. तिची ७ मुले, १५ भाचे, १८ नातवंडे, १४ पतवंडे इथपर्यंत सगळ्या तान्ह्या बाळांचे तेल-उटणे-आंघोळ-गुटी इ. सगळे प्रकार तिनी केले.
तिचा चेहरा कायम प्रसन्न असायचा. तिची हिम्मत जबरदस्त होती. तिला कधीच आम्ही रिकामे बसलेले पहिले नाही. मेंगळटासारखे, दमलेले, थकलेले देखील पहिले नाही.
तिनी कायम कष्ट केले, पण त्या कष्टांनी ती कधीच ‘गांजली’ नाही.

तरी तिच्या एका स्त्रीयांना उद्देशून केलेल्या कवितेतल्या ओळी मला लहानपणी नेहमी खटकायच्या,

जात तुझी चंदनाची, असे झिजू दे ग अंग,
सये! मांडिलीस पूजा, होऊ देई यथासांग ……..

माझ्या मुळातल्या आळशी स्वभावाला हे असे ‘झिजणे’ वगरै कधीच झेपण्यासारखे नव्हते. पण कदाचित, ते ओळखूनच, माझ्यावर स्वैपाक शिकण्यासाठी तिच्याकडून जास्त दट्ट्या असायचा. मला तर नारळ खवायचा सुद्धा कंटाळा यायचा. मग ती सांगायची, ‘आपलयाला आवडते ना चटणी, छान लागते ना, मग त्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावेच लागणार. कंटाळत बसलीस तर काम लांबेल. आहे काय त्यात एवढे? करून टाक चटकीन!’
खरें तर तिचा सगळ्याच कामांसाठी हाच मंत्र असायाचा, “आहे काय त्यात एवढे? करून टाक चटकीन!” शिवाय काहीतरी ‘मिळवण्यासाठी’ काहीतरी ‘द्यावे’ लागते, हे शिकण्याची माझी हीच पहिली पायरी होती.
तशी ती बुरसटलेल्या विचारांची अजिबात नव्हती.
मुलांना नवीन , वेगळे असे काहीतरी आवडते हे तिला पक्के माहित होते. १९५० च्या दशकात तिनी घरीच पाव, बिस्किटे केके, वगरै केले होते- अर्थात बिना अंड्याचे. पपई, पेरू, अंजीर, जांभूळ अशा फळामध्ये अंगचेच ‘पेक्तीन’ असते हे शोधून काढले, आणि ती फळे वापरून ती घरीच जाम जेली वगरै करायची. अर्थातच शेजारीपाजारीपण वाटायची.
बॉबकटची फॅशन आल्यावर, मुलींना हौस असते हे ओळखून तिनी घरीच माझ्या मावश्यांचे अतिशय सुंदर हेअरकट केले होते. येकदम हिरवीण दिसायच्या दोघी! मी कोलेज मध्ये असताना तिनी एका माझ्या वाढदिवसाला मला ‘तुला आवडते ना, तुझ्यासाठी जीन्स घे’ असे सांगून पैसे दिले होते.
तशी विचारानीपण ती मोकळी होती. माझ्या मावशीच्या एका मैत्रिणीचे पती चाळीशीतच अचानक गेले. २ मुले होते. पण तिचे लग्न परत करून द्यावे, यासाठी तिनी स्वत: घरी जाऊन त्या मैत्रिणीच्या वडलांशी चर्चा केली होती. त्याचा काही उपयोग झाला नाही याबद्दल मात्र तिला कायम खंत होती. ती वयानुरूप आलेल्या शहाणपणाने फक्त शिकवत, सल्ले देत राहिली असेही नाही. उतार वयातदेखील तिच्याकडे स्वत:ला पारखण्याची हिम्मत होती.
माझी आई, मावशी, मामा वगरै , आमच्याशी मुलांशी भरपूर गप्पा मारतात हे बघून ती एकदा आईला म्हणाली, ‘मला तुम्हा मुलांबरोबर कधीच असा इतका वेळ घालवता आला नाही. तेदेखील महत्त्वाचे आहे. माझे थोडे चुकलंच. ‘
तसे म्हटले तर तिची खूप गोष्टीत निराशाच झाले होती. ती स्वत:, आजोबा, तिची मुले यांच्यापैकी कुणाचेच त्याच्या गुणांच्या मानानी, नाव, करियर, प्रसिद्धी, कोतूक, वगरै गोष्टी झाल्या नाहीत. उलट जरा खडतरच योग आले. पण ती त्यामुळे कधी कावलेली दिसली नाही.
जे जे समोर येईल त्याला तोंड देणे, ते मनापासून, उत्तम करणे हे तिला पक्के माहित होते.
तिच्या अशा मृदू आणि लढाऊ अशा दोन्ही गुण दाखवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा विचार केल्यावर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, की तिनी स्वत:ला पूर्ण ओळखलेले होते, ती कशी आहे, तिला स्वत:ला काय हवय, ती काय करू शकते आणि तिच्या आणि तिच्या संसारातल्या सर्वांच्या संपन्न आयुष्यासाठी तिनी काय करायला हवय याची तिला पूर्ण जाण होती. तिनी तिचे चंदनाचे गुण पूर्ण ओळखले होते.
त्याच कवितेतल्या शेवटच्या ओळी होत्या,

चंदनाच्या अंगसंगे बाभूळाही गंध जोडी,
जात तुझी चंदनाची, तुझे ‘मी’ पण ना सोडी!

एक स्त्री म्हणून नैसर्गिकरीत्याच व समजव्यवस्थेचा भाग म्हणून, जमवून घेणे, कष्ट करणे, दु:ख सोसणे या गोष्टी वाट्याला येणार हे तिनी गृहीत धरले होते. पण सगळे निभावून नेण्याचे सामर्थ्य देखील स्त्री म्हणूनच वाट्याला आले आहे हेदेखील तिला पक्के माहित होते. तिनी आजोबांचे, मुलांचे, नातवंडांचे सगळे लहानमोठे हट्ट पुरवले, पण कधीही स्वत:ला किंवा कुणालाही पायाची दासी वगरै मानले नाही.
कुणासाठीही काही करताना ती नोकर, आया वगरै नसायची, ती ‘दात्री’ होती! ती ”सबला’ होती!

—Kavita….

********************************************************************************************************************************

तिच्या मनातून………………...

आज या अथांग उत्तुंग हिमालयाच्या पायथ्याशी येऊन पोचलेय…
त्याचे अस्तित्व अगदी एखाद्या गंभीर पण आश्वासक मुनींसारखे भासतंय …
असे वाटतंय की कितीतरी काळापासून प्रवास करतेय, करतेय ……. ते शेवटी या इथे पोचण्यासाठीच.
आत्तापर्यंत सोबत असलेले सगळेच निघून गेलेत पुढे, कधीचेच.
पण मला भीती वाटत नाहीये, कसलीच नाही, कधीच वाटली नाही, ना माणसांची, ना संकटांची, ना परिस्थितीची, ना जगण्याची, ना मरणाची!
पण मला आता अजून पुढे मात्र जाता येत नाहीये…. खरें तर माझी तशी इच्छाही नाही.
मला खरोखरच कधी कसली इच्छा होती का?
मला तरी आता आठवत नाही.
होती ती फक्त आग, प्रचंड आग!
माझ्यासकट सगळे काही जाळणारी आग. जन्मापासून माझ्या सोबत असलेली सूडाची आग.
खरें तर मला कधी कळले नाही, त्या जगद्म्बेनी कशासाठी मला जन्माला घातले.
माझ्या भावाच्या जन्माला तरी काहीतरी निमित्त होते. त्याला एक काम करायचंच होते. माझ्या वडलांच्या मनातला धगधगता सूड पूर्ण करायचा होता.
पण मी कशासाठी आले? मी काय केले? मी काय मिळवले? मी कुणाला काय दिले?
या शेवटच्या क्षणांमध्ये मी या मूळ कारणांचा विचार करतेय, हे किती विचित्र आहे.
किती अलगद रहात होते मी लहानपणी….. पुढच्या सगळ्याच गोष्टी कल्पनातीत घडल्या…
इतकी वर्षे झाली, अजूनही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो, भीतीनी, आश्चर्यानी….
असा अपमान होऊ शकतो, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते मला.
ज्याबद्दल कृतज्ञता वाटावी, अशी प्रत्येक गोष्ट अचानक भोगवस्तू कधी ठरली, कळलेच नाही.
राज्यसत्ता ही उत्तरदायित्व ना ठरता उपभोग्य ठरली,
भूमाता आणी स्त्री आदरणीय ना ठरता उपभोग्य ठरल्या!
तो फक्त माझाच नाही, माझ्याच कुळातल्या अनेक मातांचा देखील अपमान होता.
सृजनशक्तीचा असा अपमान होऊ शकतो, असे खरेच कधी वाटले नव्हते….
‘त्या’ सोळाहजार जणींचे दु:ख एकाच वेळेस अंगावर कोसळले.
लहानपणापासून ऐकत आले होते, की आता कलियुग सुरु होणार आहे, घोर कली पसरणार आहे, अंध:कार येणार आहे,… हेच का ते कलीयुग?
खरोखरच तेंव्हा असे भासत होते, माझ्या सभोवताली काळाकभिन्न धुरासारखा कली मला कोंडून टाकत होता, आणि मी एकटीच धगधगत त्याला जाळू पहात होते.
त्या क्षणी मला स्वत:लादेखील माहित नव्हते, की या आगीत पुढे काय काय होरपळून निघणार आहे!
………………………………………………
पुढचे संपूर्ण आयुष्य जगले ते केवळ त्या एका करुणेच्या आधारावर.
माझ्याकडे पाहताना त्याच्या नजरेतून उतरलेले ते कारुण्य आणी त्यानंतर माझ्या जीवनातली सगळीच आसक्ती जाळून टाकणारे ते त्याच्या डोळ्यातले वैराग्य.
त्याच्या नजरेतूनच मला जाणावले, हे सगळे मला भोगावच लागणार होते,… दुसरा इलाजच नव्हता!
जणू काही तो सांगत होता, कणखर हो, अलिप्त हो!
बास्स…….इतकीच एक मौल्यवान गोष्ट आहे माझ्या उभ्या आयुष्यात…..

आज इथे हे शेवटचे श्वास मोजत शांतपणे मृत्यूची वाट बघतेय…….. खरें तर हे विचारही नको वाटतायत…
खरें तर जगणे कधीच संपले होते, माझी मुले, माझा भाऊ काळानी ओढून नेले, त्याच क्षणी मीदेखील संपले.
ज्याच्या करुणेवर पुढची ओझी ढकलली, तो तर असा अचानक, ना सांगताच निघून गेला.
माझ्या संपूर्ण जगातलाच प्राणच संपला. आम्ही सगळेच हतबल झालो.
केवळ त्याचे एक हसू, एक नजर, एक शब्द, आम्हाला जगण्याची ताकद देत होते.
एरवी माझ्यावर सतत कसल्या ना कसल्या नात्यांचे ओझे होते, कन्या, बहीण , पत्नी,सून, आई, सम्राज्ञी,….संपतच नाहीत अपेक्षा कुठल्या नात्यांच्या.
फक्त त्याच्यासमोर असल्यावरच जाणवायचे, की मी मी आहे, एक अस्तित्व.
या अथांग विश्वासमोर जरी क्षूद्र भासले, तरीही, एक एकमेवाद्वितीय सुंदर अस्तित्व. जगदंबेची निर्मिती!
आता तो नाहीसा होणे ही कल्पना देखील इतकी सैरभैर करते मनाला.

त्याच्या आठवणीन्वरच आतापर्यंत तग धरला जीवानी.
त्यानंतर फक्त सावली वावरत होती माझी…. आता काही वेळात ती सावली देखील संपेल.
बास्स.. याचीच वाट पहात होते मी कितीतरी वर्षे.
आपलेच आयुष्य असे ओझे होऊ शकते हे मला कधी माहीतच नव्हते.
आज या इथे अचानक पायातले त्राण संपले, आणि मनानी सुटकेचा श्वास सोडला.
…आता मात्र नक्की संपतोय हा प्रवास.
आता फक्त आठवणीत तडफडणे संपेल….
हा यज्ञ संपेल, ही याज्ञसेनी संपेल, फक्त राख उरेल मागे.
मी मात्र मोकळी होईन….त्याच्याभोवती फेर धरायला…..

…………………………………………………………………………

—Kavita….

******************************************************************************************************************************

विपश्यना (Vipassana)

सध्या ‘ध्यान’ या विषयावर सर्वत्र गोंधळ घातलेला आहे!
त्यात माझी थोडी भर टाकतेय, आणी नेहमीचे आळशी पणा चे विचार झटकून एक गमतीदार अनुभव लिहायला घेतेय.
मला मजा आली म्हणून ‘गमतीदार’! (इतर कुणाला काय वाटते, त्याची मी पर्वाच करत नाही!)
तर मी काय सांगत होते, गेल्याच महिन्यात मी ‘विपश्यना’ चा दहा दिवसांचा कोर्स केला.
खूप वर्षांपासून जायचे होते, पण एकदम १० दिवस काढणे कठीण जात होते. पण जाऊन आल्यानंतर मात्र मी स्वत: ला खूप शिव्या दिल्या, जेव्हा वाटले होते तेंव्हाच यायला हवे होते, इतकी वर्षे फुकट घालवलीस तू!

तर ‘विपश्यना’ (Vipassana)……,
या ध्यान प्रकारात जी मुख्य गोष्ट करायची ती म्हणजे, अंतर्मुख होणे.
( थोडक्यात घरातला साठवलेला कचरा उपसून बघणे, बघायला लागला कि तो आपोआप स्वच्छ होतो, …मग ‘दिवाळी’ येतेच पाठोपाठ!)
“आत बघणे, शरीरातील घडामोडी बघणे,कारण जे पिंडी तेच ब्रम्हांडी, त्याच त्या पाच महाभूतांपासून संपूर्ण विश्व बनले आहे, आपण त्याचाच भाग आहोत, त्यांचे नियम सगळीकडे सारखे. ते ‘केवळ’ बघायचे! निसर्ग, आयुष्य, स्वत: , इतर,…. सगळेच ‘नक्की काय चाललंय’ ते समजून घेण्यासाठी हे अंतर्मुख होणे असते….”
हे सगळे वाचून झाले होते माझे पूर्वीच. प्रत्यक्ष अनुभव घेताना इतके कठीण जाईल हे माहित नव्हते!

…तर कोर्स सुरु झाला. नियम सांगितले, ‘आर्य मौन’ पाळायचे. खाणाखुणा सुध्धा करायच्या नाहीत. काही गरज पडली तर धम्मसेविका असते, तिला काय ते सांगा. सकाळी ४ ते रात्री ९ पर्यंतचे शेड्युल सांगितले. एकंदरीत १२ तास ध्यान करायचे. ( अरे देवा, कुठे येऊन पडले?! [१])

मला मौन पाळणे काही फार कठीण वाटले नाही. मला बाजूच्या अखंड पचर पचर करणार्‍या २ बायकांची मात्र काळजी वाटत होती. मला फक्त एकच मुख्य काळजी होती कि रात्री ना जेवताच, ९ वाजताच झोप कशी येणार? आणि पुन्हा ४ वाजता जाग कशी येणार? पण पहिल्या दिवशी तरी बिनघोर झोप लागली आणि महदाश्चर्य म्हणजे ४च्या आधीच ५ मिनिटे अपोआप जाग आली.

आता खरी परीक्षा सुरु…. डोळे मिटून, ना झोपता, मांडी घालून, चुळबुळ न करता आणि तेपण ‘ध्यान’ करत, दिवसातले १२ तास बसायचे कसे? ( अरे देवा, कुठे येऊन पडले?! [२])
तरीसुद्धा मन घट्ट करून, शरीर सैल सोडून, मधूनच ताठ, मधूनच कुबड काढत ‘ध्यानाला’ सुरुवात केली. चुळबुळ सुरूच होती पहिला पूर्ण दिवस.

गुरुजी ( सत्यनारायण गोएंका गुरुजी) सांगत होते, श्वासाकडे लक्ष द्या, फक्त श्वास आता येतो, बाहेर जातो, तिकडे लक्ष द्या, फक्त नाकातल्या भागाकडे लक्ष द्या.

माझे कुठले लक्ष लागायला? आधीतर उगीच मोठ्ठा श्वास घेत होते आणि फुकटची थकून जात होते, नंतर आपोआप श्वासांनी माझ्या दंगामस्तीला कंटाळून त्याची ‘नॉर्मल’ लय सुरु केली. पाठ सारखी दुखत होती, पायाला मुंग्या येत होत्या, घामाच्या धारा गळत होत्या, अखंड चुळबुळ सुरु होती, कसले ध्यान अन कसले काय? ( अरे देवा, कुठे येऊन पडले?! [३])

मन सतत कुठेतरी भलतीकडे धावत होते, उगीच नाही मनाला माकडाची उपमा देत, असा विचार आला. त्या विचाराबरोब्बर उपमा आठवला आणि उगीच भूक लागली. सकाळी काय खाल्ले, आता जेवायला काय असल वगरे विचारांवर पुन्हा मनातले माकड उडया मारायला लागले. घरी चांगली मजेत बसले होते, कुठून बुद्धी झाली आणि इथे आले हट्टानी! ( अरे देवा, कुठे येऊन पडले?! [जप])

हळूहळू पाठ भयंकर दुखायला लागली, सायटिका, स्पोंडीलायटिस वगरै सगळे प्रकार डोके वर काढायला लागले. मधूनच मी डोळे उघडून इथे तिथे बघायचे (चीटिंग! चीटिंग!). माझ्या बाजूच्याच रांगेत एक पोनीटेलवाला दादा आणे एक काका होते. नेमके ते चांगलेच मुरलेले रीपिटर्स होते. एकदम ताठ आणी स्थिर बसायचे. मला खूप लाज वाटायची त्यांच्याकडे बघून! अशा वेळेस मी गपकन डोळे मिटून पुन्हा ‘लढाई’ सुरु करायचे.

एकीकडे गुरुजी आपले सारखे कळकळीनी सांगत होते, श्वासाकडे लक्ष द्या, मन इकडे तिकडे जाईलच, त्यांनी त्रासून जाऊ नका, माकडाकडे बघता तसे ‘फक्त’ बघा….. सर्व गोष्टी ‘द्रष्टा’ भावनेनी बघा, कर्ता/ भोक्ता भावनेनी बघू नका. जे काही होत आहे ते निसर्ग नियामांनुसारच घडत रहाते. तुम्ही फक्त ‘बघा’.

मग अचानक लक्षात आले, कधीतरी काही वेळ श्वासाकडे लक्ष देताना, उगीच घाम वगरे येत नाहीये, मुन्ग्यापण येत नाहीत. म्हणजे मन स्थिर झाले कि शरीर आपोआपच स्थिर होतेय, त्यासाठी वेगळे काही प्रयत्नांचे पराकाष्ठा वगरै करायची गरज नाही. उगीच मारामारी करतेय मी स्वतःशीच.
गुरुजी सांगत होते, फक्त नाकाच्या आतल्या त्वचेकडे लक्ष द्या, तिथे श्वासाचे जाणीव “बघा”.
अचानक हे सगळे जमायला लागले… हुश्श केले मी. ( अर्थात काही ‘सेकंद’ जमत होते, पुन्हा माकडचाळे सुरु!)

श्वास कसा जातो कसा येतो हे नीट कळायला लागले, आता जाण्याचा वेग बाहेर येण्याचा वेग, हे सगळे ‘जाणवायला’ सुरुवात झाली. आपण केवढी तरी हवा आता घेत असतो ते कळायला लागले.मला माहितच नाहते आपण ‘इत्तकी’ हवा आत घेतो ते. हळूहळू तेवढ्या भागातल्या जाणीवा इतक्या तीव्र झाल्या, कि आपण वास नक्की कुठून घेतो, त्या ग्रंथी देखील जाणवायला लागल्या. शिवाय कुंपणापलिकडच्या गाईम्हशींचा वास स्पष्ट यायला लागला. याची मात्र मला खूप गंमत वाटायला लागली.
ध्यान (Vipassana) करता करता ( आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट म्हणतात तशा) अनेक गोष्टी आठवत होत्या,
पहिले ३ दिवस काय काय कुठले कुठले, साफ विसरलेले, लहानपणचं, असे काहिही आठवून अचानक रडायला वगरै यायचे. खूपच त्रास होत होता त्या विचारांचा. घरी परत पळून जावेसे वाटायचे. परत गुरुजींचे शब्द यायचे, ‘फक्त’ बघा. शांतपणे बघा.
त्यांच्या आश्वासक शब्दावर विश्वास ठेउन जरा धीर धरला, आणि ४थ्या दिवशीच्या ‘अ‍ॅक्चुअल विपश्यना’ ची वाट बघत राहिले.

तर फायनली चौथ्या दिवशी ‘विपश्यना’ (Vipassana) सुरु झाली. गुरुजींनी तासभर सूचना दिल्या, धीर दिला ….
आत्तापर्यंत श्वासाकडे लक्ष देऊन, आपण मनाला व्यायाम दिलाय. आता मन सूक्ष्म होऊ शकतंय.
आता, त्याला आता नाकातून बाहेर काढून शरीरभर फिरवायचे!!?
(ईईईक! ही ही ही… किती सुक्ष्म झालं तरी ‘मन’ वात्रट ते वात्रटच !)
आताही संवेदनाच पहायच्या होत्या, पण आता डोक्यापासून सुरु करून हळूहळू एक एक करत पायापर्यंत जायचे. गुरुजी सगळेच सोप्पे करून सांगत होते. काही जाणवत नसेल तर आधी फक्त त्वचेला होणार्‍या संवेदानांकडे लक्ष द्या. कपड्याचा स्पर्श, मधूनच येणार्‍या वार्‍याचा स्पर्श हे बघा. नन्तर हळूहळू लक्ष आत न्यायचे.
आता जाणीवा पूर्वीपेक्षा तीव्र झाल्या होत्या, त्यामुळे कळायला लागले, की आपण एरवी कित्तीतरी गोष्टी ‘गृहीत’ धरत असतो. कपड्याचा स्पर्श, वाहत्या हवेचा स्पर्श प्रत्येक वेळेस कित्ती वेग-वेगळा असतो, आपले स्वत:चे तापमान कसे बदलते, या गोष्टी कधी पाहिलेल्याच नसतात. झुळूक आली की ‘इत्तके’ छान वाटत होते, काय सांगू?! मी त्या ३-४ राईड्स खूप एन्जॉय केल्या, जणू काही आयुष्यात पहिल्यांदाच वारा ‘खात’ होते!
मग अजून आत ‘ बघायला’ सुरुवात केली. सुरुवातीचे ३ दिवस मला सतत तळपाय-तळहात आणी मान याच्यातून उष्णतेचे लोटच्या लोट बाहेर पडत असल्यासारखे वाटत होते. आता मात्र पूर्ण शरीर अगदी तालात काम करताय असे वाटत होते. आधी संपूर्ण शरीरात ठोके जाणवायला लागले. त्या ठोक्यांच्या तालावर ३-४ राईड्स घेतल्या.
जितके खोल लक्ष द्यायला लागेन तेवढी जास्त खळबळ जाणवायला लागली. शरीरातले रस आणी त्यांची धावपळ ‘दिसायला’ लागली. मनात विचार आला, काही काम ना करता नुसती स्थिर बसलेय तरी इतकी खळबळ-हलकल्लोळ इ. प्रकार जाणवतायत. एरवी आपण एकाच वेळेस १७६० उद्योग करत असतो. त्यावेळेस तर कित्त्तत्त्ती गोंधळ सुरु असेल, त्यामुळे फुटून कसे काय नाही जात शरीर?
‘च्यायला, काय सिस्टीम बनवलीये निसर्गानी! इतकी कॉम्प्लीकेटेड, तरीही कॉम्पॅक्ट आणी युजर फ्रेंडली देखील!’
मात्र अंगात घड्याळ बसवल्यासारखे, मला बरोब्बर १ तासांनी हे सगळे खेळ थांबवून उठावे लागायचे. ‘ मरणाची’ तहान लागलेली असायची बसल्याबसल्या. दर तासाला ३००मिलिची एक बाटली भरून घटाघटा पाणी प्यायचे, जरा २५-३० पावले चालून न अवाघाडलेले अंग उगीच मोकळे करायचे. की पुन्हा ‘राईड्स’ सुरु. …….
आता थोडे विषयांतर: बरेच लोक त्राटक (ज्योती/तारा) ध्यान करतात, त्यांनी सुद्धा जाणीव सूक्ष्म व्हायला मदत होते. तार्‍याची/ज्योतीची ‘लुकलुक’ खूप वेगात असते. एरवी सहज मोजता येत नाही. त्यावर मन एकाग्र केले की हळूहळू प्रत्येक ‘चमकणे’ आणी ‘विझणे’, त्यातील अंतर हे वेगळे कळायला लागते. ‘काळाची’ जाणीव सूक्ष्म होते.
याचा एक चांगला उपयोग, ‘इम्पल्सीव’ लोकांना होऊ शकतो. रागाच्या/ भावनेच्या भरात पटकन काहीतरी बोलून जातात, काहीतरी करून टाकतात,आणि नंतर वर पुन्हा सांगतात, “मी काय केले/कधी केले, कसे केले, मला कळलेच नाही! ” अशा लोकांनी थोडेसे ध्यान केल्यास निदान त्याना कळेल तरी कधी कधी नक्की काय काय झाले ते.
असो.
इथे मात्र आपण ध्यानासाठी बाहेरचे काही उसने घेत नाही, आपलाच श्वास धरतो. पण एरवी ज्याना असे काहीतरी ‘इंस्ट्रुमेंट ‘ घेऊन ध्यान, जप, पूजा करायची सवय आहे त्यांना हे सुरुवातीला कठीण जाऊ शकते. नुसत्या श्वासावर ध्यान केंद्रित करून पुढे खोल खोल जायचे म्हणजे पुडीचा दोरा वापरून ‘बंजी जम्पिंग’ करण्यासारखे वाटते.( ‘ध्यान करताना’ मध्येच हे असे विचार करत मला फिसकन हसू यायचे.)
त्या दिवशी प्रवचनात गुरुजींनी सांगितले, संस्कार/ विकार कसे निर्माण होतात.
आधी एखादी गोष्ट घडते, ( उदा. कुणीतरी शिवी घातली!), मग संवेदना निर्माण होते, तो संदेश मेंदूपर्यंत वाहून नेला जातो. मेंदू देता स्कान करून तुलना करतो, ही शिवी आहे. घाण आहे. मग दु:खद संवेदना निर्माण करतो. शिवाय पुन्हा आदेश देतो, उलट शिवी घाल!
…की झाले सुरु भांडण ….
हे जे घाण आहे म्हणून कळते, तिथेच जागे व्हायचे, द्रष्टा भावना ठेवायची, भोक्ता नाही. मग पुढचे विकार निर्माण होतच नाहीत….इ.
हे सगळे खर तर खूप कठीण जाते, आपल्याला सवय नसते ना ‘जागे’ रहायची.
आणी विपश्यना म्हणजे तर ‘प्रतिक्षण सजग’ राहणे!
याचा विचार करत बाहेर आले, तर चप्पल स्टॅंड समोरच्या फळ्यावर पुढच्या दिवशीचा ‘कार्यक्रम’ लावला होता.उद्यापासून ‘अधिष्ठान’ सुरु. दिवसातून ३ वेळेस,१ तास पूर्ण ध्यान.बिलकुल हलायचे नाही! मी आत्तापर्यंत खाजवायला, घाम पुसायला, मांडी बदलायला पुष्कळ नाचत होते. उयापासून फेविकॉल लावायचे सगळीकडे!
(पुन्हा एकदा.. अरे देवा, कुठे येऊन पडले!)
मग अचानक स्वत:ची लाज वाटली, मनात म्हटले, ‘गधडे, पूर्वी लोकांनी अरण्यात १२-१२ वर्षे तप केलंय. इथे आरामात गादीवर १ तास बसायला तुझी काय हाडे मोडली का?’
चूपचाप खोलीत जाऊन गपगार झोपून गेले.

ठाण ठाण ठाण ठाण ….. टोले पडले. ४ वाजले.
आजपासून ‘द्रष्टा’ भावनेची खरी परिक्षा सुरु!
आता मन सतत वरपासून खाल पर्यंत, पुन्हा खालपासून वरपर्यंत फिरवायची ‘राईड’ सुरु करायची होती. पण आधी सारखे ‘कठीण’ वगरै वाटत नव्हते. मन इकडेतिकडे धावायला लागले तरी त्याला पुन्हा श्वासावर चढवून बसवायचे, नाकावर आणायचे, आणि मग पुन्हा वर-खाली-वर-खाली…सुरु करायचे. (….. मन पाखडून काढले अगदी!)
गुरुजी आता गौतम बुद्धाबद्दल सांगत होते, की त्यानी असेच अंतर्मुख होऊन, विपश्यना (Vipassana) करून, सर्व संस्कार -विकार शोधून काढले, आणी याच पद्धतीनी नष्ट केले.
अत्यंत खोल-सूक्ष्म जाणीव निर्माण झाल्यानंतर त्यांना दिसले, की सतत- आपली डोळ्याची पापणी लावते तितक्या काळात, शत कोटी सहस्त्र वेळात ‘कण’ निर्माण होऊन नष्ट होतात.
हाच निसर्गाचा मूळ नियम. ( मी थक्क झाले, आणी गौतम बुद्धाला शत कोटी सहस्त्र वेळा साष्टांग नमस्कार घातला!)
आपल्या शरीरात देखील असाच सतत बदल होत असतो. आपण जितके सजग राहू, तितका बदल ‘योग्य’ प्रकारे घडेल. ‘विकार’ निर्माण होणार नाही. त्यासाठीच अंतर्मुख व्हायचे. कारण जे काही आहे ते आपल्या शरीरातच आहे. आणि आपण आपल्या ६ इंद्रियांनी सगळे संस्कार निर्माण करत असतो, सतत सावध, सजग राहिले, कि ‘संस्कार’ निर्माण होणार नाहीत. निसर्ग त्याचे त्याचे ‘उत्पत्ती-स्थिती-लय’ हे चक्र अविरतपणे चालू ठेवेल. आपण आपली इंद्रिये ‘मलीन’ करून त्या गोष्टींचा ‘ट्रेस’ शिल्लक ठेवायचा नाही.
इथे सहावे इंद्रिय म्हणजे ‘मन’!
मन वेगळे दिसत नाही ( म्हणजे अजून तरी आपल्या यंत्रांना दिसत नाही), पण ते शरीराबरोबरच असते, आणी त्यातल्या घडामोडी मात्र, आपला नैसर्गिक- अफाट कार्यशक्ती आलेला संगणक- मेंदू, त्याच्या असंख्य ‘प्रोब्स’- नर्व वापरून, साठवत राहतो. शेवटी पाचही इंद्रियांच्या सगळ्या जाणीवा मनाकडेच जातात, आणी पाचही इंद्रिय शांत केली तरी, मन,’चालू’ राहते, म्हणून ‘मन’ हे इंद्रिय. एकदा पूर्ण अंतर्मुख झाले, की ही गोष्ट अगदी सहज जाणवते.
तर असा अभ्यास सुरु होता. तरीही ‘मन’ सतत जुन्या आठवणीत किंवा कल्पनाविश्वात पुन्हा पुन्हा धावत सुटायचे. त्याला पुन्हा श्वासावर बसवून ‘घरी’ पकडून आणायचे हा खेळ सुरु होता.
एकीकडे ‘अधिष्ठान’ सुरु होते. सुरुवातीला जमणार नाही असेच वाटत होते. पण आश्चर्य म्हणजे अगदी सहज जमले. असे संपूर्णपणे वर्तमानात आणि संपूर्णपणे आपल्याच आतमध्ये बघताना, (आत म्हणजे शरीर आणि मन दोन्हीत , कारण दोन्ही एकमेकांबरोबरच असतात) नुसते मजेत खेळत असल्यासारखा आनंद मिळतो. आणि महत्त्वाचे म्हणजे या खेळात कुठलीही स्पर्धा नसते!
अशा सगळ्या खेळात , विचारात असताना, एकीकडे दर तासाला बाहेर पडून पाणी ढोसणे सुरूच होते. अगदी खेळून दमून आल्यासारखे पाणी पीत होते. नंतर एका जाणकार ताईनी सांगितले, की कुठलेही ‘ध्यान’ करताना, शरीरात खूप वेगानी बदल होतात, तेंव्हा तहान लागो, ना लागो, पाणी भरपूर पीत राहायचे. नाही प्यायले तर त्रास होतो.
सहज बाहेर फिरताना एकदम लक्षात आले, ‘अरेच्चा, इथे पिंपळाचे झाड आहे, कित्ती सुंदर आहे! इथे निदान १७-१८ प्रकारची फुलपाखरे आहेत, तितक्याच प्रकारची रानफुले पण आहेत. मी काय बघत होते ५ दिवस?’ खरोखरच आपली फक्त नजर फिरते, आपण ‘पहिले’ काहीच नसते.
मग मी अजून जरा बाहेर रेंगाळले, ४ मिलीमीटर लांबीच्या निळ्या निळ्या कळ्या दिसल्या, २ मिलीमीटर व्यासाची लालचुटुक रानफुले दिसली. पांढरीशुभ्र फुलपाखरे पहिली. प्रत्येक पावलाला ‘अरेच्चा’ सुरु झाले. खरोखरच सगळ्या जाणीवा तीव्र झाल्याच्या जाणवत होत्या. प्रत्येक पावलाला, आजूबाजूच्या रानातल्या पानांचे वेगळे वेगळे वास जाणवत होते.
अचानक नवीन पृथ्वीवर आल्यासारखे वाटत होते. पूर्वी मधमाशी, गांधीलमाशी, भुंगे वगरै भोवती असले की मी जाम घाबरायचे.आता अचानक माशीची गुणगुण ऐकू आली, आणि मी त्यातले ‘स्वर’ शोधायला लागले. ‘मरे मरे,.. म्हणतेय का बरे?’ असा विचार आला, आणी एकदम आठवले, ‘च्यायला, मी कित्ती घाबरायचे हिला आत्तापर्यंत!’ हा बदल मात्र कसा काय झाला नक्की माहित नाही. पण गुरुजी सांगत होते ते आठवले, की ‘ध्यानानी ‘करूणा’ जागी होईल, द्वेष संपेल.’ भीती हेसुद्धा द्वेषाचेच प्रकटीकरण(एक्स्प्रेशनला मराठी शब्द ?). कदाचित सगळ्याच भित्या आणी राग कमी व्हायला लागतील. आणी एकदम जाणवायला लागले, अर्धे दिवस संपले इथले, अर्धेच आहेत, आता तरी सिन्सिअर्ली काम करूयात, नुसतीच टंगळ मंगळ नको. आहे अनायसे वेळ काढलेला तर कारणी लावूयात. काहीतरी सुधारणा नक्कीच होईल माझ्यात.
थोडी गंभीर झाले. आणी अजून नीट ‘ध्यान’ सुरु केले. रोज संध्याकाळच्या प्रवचनात गुरुजी आठवण करून द्यायचे, किती दिवस झाले, किती राहिले. आता तरी जागे व्हा.
आता तर ‘प्रतिक्षण सजग’ हाच मंत्र सतत होता. शिवाय आम्हाला पूर्ण अहिंसेचे पालन करायला सांगितले होते, चुकूनसुद्धा एखाद्या किड्यावर पाय पडता कामा नये यासाठी सगळेच चालताना सावध असायचे. अगदी डास देखील मारायचा नाही ( ओडोमास फासा!), फुले तोडायची नाहीत. पडलेलीसुद्धा उचलायची नाहीत, तुमचा त्यावर अधिकार नाही, ..असे सगळे नियम होते. त्यामुळे सावधानता वाढतच होती. पुढच्या दिवशी असाच पुन्हा ‘अरेच्चा’ चा एपिसोड सुरु झाला. सगळे अजूनच नवीन वाटायला लागले. आत आणी बाहेरदेखील. चादर नवीन, blanket नवीन, तोच जुना पंचा नवीन… सगळेच नवीन, वेगळे! इतकी गम्मत मला पूर्वी कधीही कशाचीही वाटली नव्हती.

एकंदरीत अधिष्ठान आणी ध्यान (Vipassana) बरे जमायला लागले होते. पण ‘खरे ध्यान’ काही सेकंदच. परत मनातून वेगवेगळे विचार उसळी मारायचे. अजूनही कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी उसळणे सुरूच होते. पण आता फरक म्हणजे, मी सिनेमा पहिल्यासारखी त्या बघत होते. आणी गम्मत म्हणजे ज्या आठवणींचा पूर्वी खूप त्रास व्हायचा, त्या ‘सिनेमात’ आता मात्र मीच ‘व्हिलन’ ठरत होते! मनात म्हटले, ‘बरोबरच आहे, शेवटी व्हिलनच मार खातो! त्याला त्रास होणारच.’ आता मात्र धडा घ्यायचा, ‘जागे’ राहायचे.
आता ध्यान फक्त हॉलमध्ये गादल्यावर बसून नव्हते, ‘प्रतिक्षण विपश्यना’ सुरु करा म्हणून सांगितले होते. मधून मधून ‘अरेच्चा!’ सुरूच होते. अचानक नवर्‍याची आठवण होऊन खूप गलबलून आले. बिच्चारा! येताना त्याला खूप चिडवून चिडवून आनंद घेतला होता, ‘मी १० दिवस तुझा पसारा आवरण्यापासून सुटका करून घेतेय! तुझे तू बघ काय ते.’ त्याचा गरीब झालेला चेहरा आठवून खूप वाईट वाटले. मनाशी ठरवले, की घर कितीही भयानक अवस्थेत आले तरी रागवायचे नाही. ३ दिवस लागले तरी चालतील. गपचूप आवरायचे. पसारा करून ठेवणे हा त्याचा धर्म, नीटनेटकेपणाची हौस हा माझा. त्यात भांडायचे काय? १० दिवसात निदान इतका तरी बदल करावा मी स्वत:मध्ये. ‘परधर्म सहिष्णुता’ बाळगायला घरापासून तरी सुरुवात होऊदे.
आता शेवटचा भाग, ‘मंगल मैत्री’. गुरुजींनी समजावून सांगायला सुरुवात केली, ‘मंगल मैत्री, म्हणजे कल्याणकारी भावना. या १० दिवसात तुम्ही जो काही आनंद मिळवलात, जे ‘पुण्य’ मिळवलात, ते आपण सर्वांनी वाटून घेऊयात. तुमची ओळख असो, नसो, सर्वाना तुमच्या या मंगल कामनेत सामील करून घ्या, सगळ्यांशी मैत्री करा’. इथपर्यंत सगळे ठीक होते, सोपे होते. अनोळखी असली, तरी आपल्याबरोबरची आपल्या सारखीच माणसे, मनानी लगेच मान्य केले. सर्वांना मनापासून, मनातल्या मनातच शुभेच्छा दिल्या गेल्या. गुरुजी पुढे म्हणाले, ‘ तुमच्या मित्र मैत्रीणीना अथवा, इतर जवळच्या लोकांना, ओळखीच्या लोकांना देखील, मनातून तुमच्या ‘पुण्यात’ सहभागी करून घ्या.’ डन! पुढे म्हणाले, ‘ तुमच्या शत्रूंना सुद्धा तुमच्या आनंदात, तुमच्या ‘पुण्यात’ सहभागी करून घ्या. तुमच्या शुभ इच्छा त्यांच्यापर्यंत पोचूद्यात.’
आता आली का पंचाईत! कितीही प्रयत्न केला तरी हे काही मला जमत नव्हते. मला मुद्दाम त्रास देणाऱ्या लोकांना मी कशाला शुभेच्छा देऊ? एरवी तोंडदेखले ‘हॅप्पी बर्थडे!’ म्हणणे वेगळे. एकवेळ वस्तू देईन, पैसे फेकेन, पण ‘पुण्य’??!! छे!
अचानक आश्चर्य वाटले, १० दिवस गौतम बुद्धांच्या शब्दांवर जगतेय, तरीही मनातला द्वेष हटत नाहीये.
परत जरा शहाण्यासारखं विचार केला, १० दिवस स्वत:ला वॉशिंग मशीनमधून खळबळून काढायचे आणी पुन्हा चिखलात लोळायचे का आता? इतरांच्या मनात राग असला तर असला, मी कशाला लागण करून घ्यायची? त्यांचे त्यांच्याजवळ. मला तरी निर्लेप राहता यायला हवे.
एकदम आपल्या लाडक्या (?) गोविंदाचे बनियनच्या जाहिरातीतले शब्द आठवले, ‘उसने धक्का दिया तो दिया, तुने क्यो लिया?’ आता गोविंदाकडूनदेखील आयुष्याचे तत्वद्यान शिकावे हे जरा कठीणच आहे. असो. …..ट्यूब तर पेटली.
आता शत्रूंना देखील ‘हॅप्पी बर्थडे!’ केले.
गुरुजींचे संध्याकाळचे प्रवचन खूप छान होते, त्यानी ‘धर्माला’ खिरीची उपमा दिली. आई सांगतेय मुलाला, खीर खारे बाळा. मुलगा म्हणतोय, ‘ही खीर माझ्या पात्रात नाही.’ म्हणजे मला समजणाऱ्या, आवडणार्‍या शब्दात, व्याख्येत बांधलेली नाही. मग आई त्या पात्रात घालून देते. तो पुन्हा म्हणतो, ‘मी खाणार नाही, त्यात काळे खडे आहेत.’ म्हणजे इतर काही ना समजणाऱ्या गोष्टी आहेत, जसे शील म्हणजे नक्की काय? समाधी नक्की कशासाठी? प्रज्ञा कशी जागी होते ? मग आई समजावते, त्याचा स्वत:चा एक स्वाद आहे. तुला नको असेल तर तेवढे ‘काळे खडे’ बाजूला ठेव, पण खीर खा. ज्या दिवशी त्याचा स्वाद तुला कळेल त्या दिवशी ते पण खा. धर्मरूपी खिरीला अंतरु नकोस. ‘सजग राहून, वर्तमानात राहून, अंतर्मुख होऊन, सत्य बघणे’ हा धर्म मात्र पाळत राहा.
असे सांगून गुरुजी म्हणाले, ‘आता गुरुदक्षिणेची वेळ आली, माझी गुरुदक्षिणा ही, की जेंव्हा जेंव्हा ‘मंगल’ मैत्री’ साधना घरी जाऊन कराल, तेंव्हा माझीदेखील आठवण ठेवा. मलाही सामील करून घ्या’.
एकदम लक्षात आले, उद्या संपतंय की शिबीर. म्हणजे उद्यापासून गुरुजीपण समोर दिसणार नाहीत. माहेर सोडून निघाल्यासारखे, माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागले. एरवी माझ्या डोळ्यातून टिपूसही येत नाही. इथे येऊन काय चालले होते कुणास ठाऊक. आजुबाजूला पहिले, तर सगळेच स्त्री-पुरुष डोळे पुसत होते. इथे खरच मी इतकी मजेत राहिले, की बाहेर गेल्यावर कुणी विचारले, काय केले १० दिवस?, तर मी सांगेन ‘धम्माल!’
तिकडच्या व्यवस्थापकांना बहुतेक कल्पना आहे, की गुरुजी खिरीचे वर्णन खूपच इफेक्टिव करतात, इच्छा निर्माण होते लगेच खीर खायची. शेवटच्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदाच, सक्काळी साडेसहाला खीर आणी बटाटेवडा असा नाश्ता करून निघाले.
निघण्या आधी पुस्तके काही पुस्तके विकत घेतली. (अजून वाचलीच नाहीत ती गोष्ट वेगळी!) काही लोक पैसे दान देखील देत होते. मी करायला जात होते, पण अचानक लक्षात आले, की मी ‘दान’ देत नाहीये, मी हिशोब करतेय, राहण्याचा, जेवण्याचा. मग थांबले, म्हटले, माझ्या कायम लक्षात राहायला हवे, की असे ‘माहेरपण’ मला मिळाले ते कुठल्यातरी अनोळखी लोकांच्या दानावर. त्यात स्वत: कमावलेले वगरै काही नाही. नाहीतरी आपण खरोखरच काय कमावलेले असते, हवा तर नक्की फुकटच असते. बाकीच्या गोष्टी ‘मायनर’ आहेत.
मात्र या सगळ्यातून मला कुठल्याही व्याख्येत ना बसवलेला एक ‘सत्य धर्म’ सापडला. इथे मला राहून राहून एका तिबेटन लामाचे उद्गार आठवत होते, ‘जितके लामा, तितके धर्म’. प्रत्येक जण वेगळा, प्रत्येकाचा ‘धर्म’ वेगळा. जे जे करून माणसाला अधिक ‘माणुसकी’ सापडेल, करूणा निर्माण होईल, तो तो त्याचा धर्म. कुणाला जपजाप्य करून, कुणाला प्रार्थना करून, कुणाला समाजसेवा करून, कुणाला जगभर हिंडून, कुणाला ज्ञान मिळवून,.. जी गोष्ट करून मन शांततेनी, समाधानानी, आनंदानी भरून जाईल, तो तो त्याचा ‘खरा धर्म’. आणी ज्या आनंदात ‘कुणालाही’ बिनबोभाट सामील करून घेता येईल, तो ‘खरा आनंद’.
‘भवतु सब्ब मंगल’.

===============================

‘result oriented’

-Kavita…….

****************************************************************************************************************************

Advertisements

Comments on: "अनिर्बंध" (3)

  1. atishay sundar varnan!!!

  2. Yes Very good ! Meditation is most important for our life.

  3. Krishnakumar Haribhau Shinalkar said:

    Very very important.!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: