तर ‘विपश्यना’ (Vipassana)……,
या ध्यान प्रकारात जी मुख्य गोष्ट करायची ती म्हणजे, अंतर्मुख होणे.
( थोडक्यात घरातला साठवलेला कचरा उपसून बघणे, बघायला लागला कि तो आपोआप स्वच्छ होतो, …मग ‘दिवाळी’ येतेच पाठोपाठ!)
“आत बघणे, शरीरातील घडामोडी बघणे,कारण जे पिंडी तेच ब्रम्हांडी, त्याच त्या पाच महाभूतांपासून संपूर्ण विश्व बनले आहे, आपण त्याचाच भाग आहोत, त्यांचे नियम सगळीकडे सारखे. ते ‘केवळ’ बघायचे! निसर्ग, आयुष्य, स्वत: , इतर,…. सगळेच ‘नक्की काय चाललंय’ ते समजून घेण्यासाठी हे अंतर्मुख होणे असते….”
…तर कोर्स सुरु झाला. नियम सांगितले, ‘आर्य मौन’ पाळायचे. खाणाखुणा सुध्धा करायच्या नाहीत. काही गरज पडली तर धम्मसेविका असते, तिला काय ते सांगा. सकाळी ४ ते रात्री ९ पर्यंतचे शेड्युल सांगितले. एकंदरीत १२ तास ध्यान करायचे. ( अरे देवा, कुठे येऊन पडले?! ) मला मौन पाळणे काही फार कठीण वाटले नाही. मला बाजूच्या अखंड पचर पचर करणार्‍या २ बायकांची मात्र काळजी वाटत होती…………………..

हळूहळू पाठ भयंकर दुखायला लागली, सायटिका, स्पोंडीलायटिस वगरै सगळे प्रकार डोके वर काढायला लागले.मग अचानक लक्षात आले, कधीतरी काही वेळ श्वासाकडे लक्ष देताना, उगीच घाम वगरे येत नाहीये, मुन्ग्यापण येत नाहीत. म्हणजे मन स्थिर झाले कि शरीर आपोआपच स्थिर होतेय, त्यासाठी वेगळे काही प्रयत्नांचे पराकाष्ठा वगरै करायची गरज नाही. उगीच मारामारी करतेय मी स्वतःशीच. गुरुजी सांगत होते, फक्त नाकाच्या आतल्या त्वचेकडे लक्ष द्या, तिथे श्वासाचे जाणीव “बघा”.
अचानक हे सगळे जमायला लागले… हुश्श केले मी. ( अर्थात काही ‘सेकंद’ जमत होते, पुन्हा माकडचाळे सुरु!)
आताही संवेदनाच पहायच्या होत्या, पण आता डोक्यापासून सुरु करून हळूहळू एक एक करत पायापर्यंत जायचे. गुरुजी सगळेच सोप्पे करून सांगत होते. काही जाणवत नसेल तर आधी फक्त त्वचेला होणार्‍या संवेदानांकडे लक्ष द्या. कपड्याचा स्पर्श, मधूनच येणार्‍या वार्‍याचा स्पर्श हे बघा.कपड्याचा स्पर्श, वाहत्या हवेचा स्पर्श प्रत्येक वेळेस कित्ती वेग-वेगळा असतो, आपले स्वत:चे तापमान कसे बदलते, या गोष्टी कधी पाहिलेल्याच नसतात.शरीरातले रस आणी त्यांची धावपळ ‘दिसायला’ लागली. मनात विचार आला, काही काम ना करता नुसती स्थिर बसलेय तरी इतकी खळबळ-हलकल्लोळ इ. प्रकार जाणवतायत. एरवी आपण एकाच वेळेस १७६० उद्योग करत असतो. त्यावेळेस तर कित्त्तत्त्ती गोंधळ सुरु असेल, त्यामुळे फुटून कसे काय नाही जात शरीर?
‘च्यायला, काय सिस्टीम बनवलीये निसर्गानी! इतकी कॉम्प्लीकेटेड, तरीही कॉम्पॅक्ट आणी युजर फ्रेंडली देखील!’

……………………..
आजपासून ‘द्रष्टा’ भावनेची खरी परिक्षा सुरु!
आता मन सतत वरपासून खाल पर्यंत, पुन्हा खालपासून वरपर्यंत फिरवायची ‘राईड’ सुरु करायची होती.
गुरुजी आता गौतम बुद्धाबद्दल सांगत होते, की त्यानी असेच अंतर्मुख होऊन, विपश्यना (Vipassana) करून, सर्व संस्कार -विकार शोधून काढले, आणी याच पद्धतीनी नष्ट केले.
अत्यंत खोल-सूक्ष्म जाणीव निर्माण झाल्यानंतर त्यांना दिसले, की सतत- आपली डोळ्याची पापणी लावते तितक्या काळात, शत कोटी सहस्त्र वेळात ‘कण’ निर्माण होऊन नष्ट होतात.
हाच निसर्गाचा मूळ नियम. ( मी थक्क झाले, आणी गौतम बुद्धाला शत कोटी सहस्त्र वेळा साष्टांग नमस्कार घातला!)

…………………………………………
सहज बाहेर फिरताना एकदम लक्षात आले, ‘अरेच्चा, इथे पिंपळाचे झाड आहे, कित्ती सुंदर आहे! इथे निदान १७-१८ प्रकारची फुलपाखरे आहेत, तितक्याच प्रकारची रानफुले पण आहेत. मी काय बघत होते ५ दिवस?’ खरोखरच आपली फक्त नजर फिरते, आपण ‘पहिले’ काहीच नसते. मग मी अजून जरा बाहेर रेंगाळले, ४ मिलीमीटर लांबीच्या निळ्या निळ्या कळ्या दिसल्या, २ मिलीमीटर व्यासाची लालचुटुक रानफुले दिसली. पांढरीशुभ्र फुलपाखरे पहिली. प्रत्येक पावलाला ‘अरेच्चा’ सुरु झाले. खरोखरच सगळ्या जाणीवा तीव्र झाल्याच्या जाणवत होत्या. प्रत्येक पावलाला, आजूबाजूच्या रानातल्या पानांचे वेगळे वेगळे वास जाणवत होते. अचानक नवीन पृथ्वीवर आल्यासारखे वाटत होते.  पुढच्या दिवशी असाच पुन्हा ‘अरेच्चा’ चा एपिसोड सुरु झाला. सगळे अजूनच नवीन वाटायला लागले. आत आणी बाहेरदेखील. चादर नवीन, blanket नवीन, तोच जुना पंचा नवीन… सगळेच नवीन, वेगळे! इतकी गम्मत मला पूर्वी कधीही कशाचीही वाटली नव्हती.

………………………

एकंदरीत अधिष्ठान आणी ध्यान (Vipassana) बरे जमायला लागले होते. पण ‘खरे ध्यान’ काही सेकंदच. परत मनातून वेगवेगळे विचार उसळी मारायचे. अजूनही कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी उसळणे सुरूच होते. पण आता फरक म्हणजे, मी सिनेमा पहिल्यासारखी त्या बघत होते. आणी गम्मत म्हणजे ज्या आठवणींचा पूर्वी खूप त्रास व्हायचा, त्या ‘सिनेमात’ आता मात्र मीच ‘व्हिलन’ ठरत होते! मनात म्हटले, ‘बरोबरच आहे, शेवटी व्हिलनच मार खातो! त्याला त्रास होणारच.’ आता मात्र धडा घ्यायचा, ‘जागे’ राहायचे.

………………………………………….

मात्र या सगळ्यातून मला कुठल्याही व्याख्येत ना बसवलेला एक ‘सत्य धर्म’ सापडला. प्रत्येक जण वेगळा, प्रत्येकाचा ‘धर्म’ वेगळा. जे जे करून माणसाला अधिक ‘माणुसकी’ सापडेल, करूणा निर्माण होईल, तो तो त्याचा धर्म. कुणाला जपजाप्य करून, कुणाला प्रार्थना करून, कुणाला समाजसेवा करून, कुणाला जगभर हिंडून, कुणाला ज्ञान मिळवून,.. जी गोष्ट करून मन शांततेनी, समाधानानी, आनंदानी भरून जाईल, तो तो त्याचा ‘खरा धर्म’. आणी ज्या आनंदात ‘कुणालाही’ बिनबोभाट सामील करून घेता येईल, तो ‘खरा आनंद’.
‘भवतु सब्ब मंगल’.

===============================

‘result oriented’

-Kavita…….

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: